*Image is only for representation purpose.
आज आनंदाचा दिवस होता. कोरोना वर मात करून माझ्या मैत्रिणीचे बाबा आज घरी परतत होते. आज इतके दिवस बातम्यांमध्ये मध्ये पाहिलेला प्रसंग माझ्या बाजूच्या चाळीत घडला. बघायची इच्छा होती पण बघता येत नव्हतं. सगळं सुरळीत झालं माझ्या मैत्रिणीचे बाबा कोरोना वर मात करून व त्यांचा पूर्ण परिवार हॉस्पिटलमधून घरी परत आला. दोन दिवस उलटून गेले. मी माझ्या मैत्रिणीला कॉल केला. तिने फोन उचलला आणि म्हणाली “अगं मी गावी आली आहे.” मी विचारलं परवाचं तर घरी आलीस. गावी कधी गेलीस ? ती म्हणाली परवा आम्ही सर्व हॉस्पिटलमधून घरी आलो. पण जेव्हा बाबा भाजी आणायला म्हणून बाहेर पडले तेव्हा चाळीतल्यांनी घाबरून दरवाजा बंद केला!! म्हणून आम्ही गावी निघून आलो. तिचं हे बोलणं ऐकून मला काय बोलावं हे सुचलंच नाही. मला विचार पडला की खरंच फक्त कोणालातरी कोविड-१९ हा रोग झाला आहे. म्हणून माणुसकी विसरून समोरच्याशी तुच्छ वागणं कितपत योग्य आहे. मान्य आहे की हा रोग संसर्गजन्य आहे. पण संसर्गजन्य रोग आहे म्हणून त्या रुग्णाला व त्याच्या परिवाराला वाळीत टाकल्यासारखी वागणूक देणे योग्य नाही. या रोगाशी लढून आल्यानंतर त्या रुग्णाला व त्यांच्या परीवाराला एवढे दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर त्यांना आजूबाजू वाल्यांकडून प्रेम माणुसकी आणि मुख्यता मानसिक आधाराची गरज असते. त्यांना ते आपल्यापेक्षा वेगळे आहेत अशी वागणूक न देता त्यांना कोविड-१९ सारख्या रोगाशी लढण्यासाठी हिम्मत देणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे. या आजारात शारिरिक रित्या रुग्ण अशक्त होतात पण त्यांना मानसिक आधार दिला की त्यांचे मनोबल वाढते. अनेकदा असं होतं की रुग्णांना भीती वाटू लागते की लोक त्यांना आता कुठला नजरेने बघतील त्यांना कशी वागणूक देतील. अशावेळी त्यांच्याशी कॉल वर बोलून त्यांना मानसिक बळ वाढवून नव्यानं आयुष्य जगायला सहकार्य करायला हवं. आपण सामाजिक अंतराचे भान ठेवून सर्व सरकारी नियमांचे पालन करत कोविड-१९ झालेल्या रुग्णांना व त्यांच्या परीवाराला सहकार्य करू शकतो. त्यांची योग्य रीत्या घेतलेली काळजी प्रेम व आपुलकीने केले ली विचारपूस त्यांचे मनोबल वाढू शकते. आणि हो आपल्याला हा रोग नष्ट करायचा आहे माणसातली माणुसकी व सामाजिक बांधिलकी नाही. जसं कॉल केल्यानंतर प्रत्येक कॉलच्या मध्ये सूचना केली जाते तसंच “लक्षात ठेवा आपल्याला रोगाशी लढायचे आहे रोग्याशी नाही.”
– शुभांगी विजय धनुर्धारी
इंटर्न, रजनी फाउंडेशन इंडिया