जीवन इतके सुंदर आहे, अनुभव तुम्हास येत जाईल, प्रयत्न करायला विसरू नका, मार्ग तुम्हाला सापडत जाईल. तरीही माहित नाही का ? आपण आयुष्यात आलेल्या संकटांन पुढे इतकं निराश होतो की आपल्याला असं वाटतं आत्महत्या हाच एक पर्याय आहे. आत्महत्या या शब्दाचा अर्थच स्वतःहून स्वतःची हत्या करणे आणि मला खरंच विचार पडतो की एवढं काय महत्त्वाचं असतं आपल्याला आयुष्यात की आपण जगण्या ऐवजी मरण्याचा विचार करतो. देवाने आपल्याला दिलेले इतकं सुंदर आयुष्य आत्महत्या करुन संपवण फार चुकीच आहे. म्हणजे मला आत्महत्येच्या बातम्या बघितल्या की हाच विचार येतो की जीवापेक्षाही एवढं काय मौल्यवान असेल की लोक आत्महत्या करून जीवन संपवण्याचा विचार करतात. जीवन ही मानवाला लाभलेली अमोल देणगी आहे. तिचा चांगला उपयोग करणे महत्त्वाचे आहे.

आत्महत्या करण्याची कारणं ही फार असतात  एखाद्या गोष्टीत अपयश आलं. आपल्याला हवी ती गोष्ट नाही मिळाली किंवा मग आपण एखादया गोष्टीमध्ये चुकलो. पण माझ्या मते ही सगळी कारणं खरं तर आपल्या आयुष्यच्या चा भाग आहेत. आत्महत्या करण्याची कारणे नाहीत, कारण आयुष्य जगण्यात संघर्ष नसेल यश-अपयश नसेल तर मग ते आयुष्यच नाही. आपले जीवन हा एक अनुभवप्रवाह आहे. प्रत्येक व्यक्तीचे जीवनाविषयीचे मत हे त्याला स्वत:ला येणार्‍या अनुभवांवर अवलंबून असते. जीवनात चढउतार असणार. जीवन म्हणजे ऊन-सावलीचा खेळ असतो. सतत सुख किंवा सतत दु:ख असे क्वचितच आढळते. आयुष्यात येणारा प्रत्येक संघर्ष आपल्याला नव्याने पुन्हा उभे राहण्याची आणि आपण जिवंत आहोत याची जाणीव करून देत असतो. महाभारतात देवालाही संघर्ष चुकला नव्हता आणि आपण तर माणूस आहोत. संकट यश-अपयश हे आपल्या आयुष्याचे भाग आहेत. अपयश आलं याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही ती गोष्ट पुन्हा कधीच करू शकणार नाहीत याचा अर्थ असा होतो की तुम्हाला त्या गोष्टीत अजून चांगल्या रितीने शिकण्याची व तुमचं त्या कामामधलं कौशल्य वाढवण्याची गरज आहे आणि पुढे तुम्ही त्या कामात नक्की यशस्वी व्हाल.आयुष्यात एखाद्या गोष्टीत चुकलात तर झालेल्या चूकीबद्दल नकारात्मक विचार करण्यापेक्षा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. आपण केलेली प्रत्येक चुक आपल्याला काहीतरी शिकवत असते फक्त आपला दृष्टीकोन सकारात्मक हवा. स्वतःशी बोला. जगाचा विचार करण्यापेक्षा स्वतःला केलेल्या चुकीबद्दल माफ करून झालेली चूक आयुष्यातून संपवा. आयुष्य नका संपवू. कारण आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त एका चुकीमुळे आयुष्य संपवणे योग्य नाही आणि माझ्या मते तर आयुष्यात संकट किंवा चुक कितीही मोठी असो त्याला उपाय आत्महत्या कधीच असू शकत नाही. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटात आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवला ना, तर मग  कधीच आपल्याला आयुष्य संकट वाटणार नाही व आपल्या सोबतच दुसऱ्यांनच्या ही आयुष्यात आनंद पसरवू आणि कवी मंगेश पाडगावकर यांच्या सुरात सूर मिसळून म्हणाल- ‘या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे ’.

– शुभांगी धनुर्धारी
इंटर्न, रजनी फाउंडेशन इंडिया

6 responses

Leave a Reply