आज भारतातील प्रत्येक स्त्री सुशिक्षित आहे. स्वतःचे विचार ती ठामपणे मांडते. स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते आहे आणि मुख्य म्हणजे आजची स्त्री प्रत्येक गोष्टीत सज्ञान आहे. यामागचं सगळ्यात महत्तवाच व्यक्तिमत्व अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी एक ज्योत आणि ती म्हणजे “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले.” सर्वप्रथम त्यांना विनम्र अभिवादन!

उदारण्या भारतमातेच्या लेकी
माय दिली तू सुखाला आहूती।
सावित्रीमाई तुझ्यामुळेच ग
तेवते आहे जगती ज्ञानज्योती।।

ज्या काळात स्त्रीला समाजात मनाचे स्थान मिळत नव्हते; शिक्षांपासून आणि स्वातंत्र्यापासून दूर ठेवून स्त्रीला परावलंबी आणि परतंत्र ठेवले जात होते. समाजात दरिद्रता, विषमता, अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्पृश्यता खच्चून भरलेली होती. समाज पिळवणूक, फसवणूक, कर्मठता अशा एक ना अनेक समस्यांनी ग्रासलेला होता. हे आज सांगून देखील खरे वाटणार नाही. कोणतेही स्वातंत्र्य तर जाऊ द्या. पण शिकणे आणि शिकवणे हे पाप समजले जाई. अशा अंधकाराने भरलेल्या समाजात ३ जानेवारी १८३१ रोजी एका तेजाचा उदय झाला. या सूर्यनारायणरुपी तेजाचे नावदेखील सूर्याच्या एका नावांपैकी होते “सावित्री.” त्या काळी बालविवाह करण्याची प्रथा होती. त्यामुळे वयाच्या नवव्या वर्षीच सावित्रीबाईंच लग्न लावून देण्यात आले.पण भाग्याची गोष्ट म्हणजे ज्यांच्यासोबत सावित्रीबाईंचे आयुष्य जोडले गेले ते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या परीस स्पर्शांने सावित्रीबाईंच्या आयुष्याचे सोने केले. सावित्रीबाईं चा स्वभाव लहानपणापासून धाडसी जिद्दी व स्वाभिमानी होता.त्यांचे हेच गुण अन्यायाविरुद्ध लढताना व समाजाचे संघर्ष करताना त्यांच्या कामी आले. लग्नापूर्वी काहीही न शिकलेल्या सावित्रीबाईंनी लग्नानंतर एका वर्षातच ज्योतिबांच्या प्रेरणेने शिक्षणाला आरंभ केला.

ज्योतिबांना माहित होते शिक्षण हे असे शस्त्र आहे जे समाजाला गुलामगिरीतून मुक्त करू शकेल आणि जर स्त्रियांना त्यांचे हक्क मिळवून द्यायचे असतील तर त्यांना सर्वात आधी शिकवले पाहिजे.शिक्षणामुळे स्त्रिया सज्ञान होतील. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होईल आणि त्या अत्याचाराविरूद्ध लढण्यासाठी सक्षम होऊ शकतील. स्त्री शिक्षणाचे हे काम सावित्रीबाई उत्तम प्रकारे करू शकतात हा त्यांचा विश्वास होता म्हणून प्रथम त्यांनी सावित्रीबाईंना शिक्षण देण्याचे निश्चित केले. महात्मा ज्योतिराव फुले यांनी सावित्रीबाईंना शिक्षित केले. त्यानंतर १८४८ साली महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा उघडून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. पण मुलीना शिकवयाचे धाडस करायला कुणी शिक्षक पुढे येईना. तेव्हा सावित्रीबाई शाळेत जावून मुलीना शिकवू लागल्या . बायकांनी शिकणे हे महापाप . आणि त्यांना शिकवणे हे तर महाभयंकर पाप, असे त्या काळी सर्वच समाज समजत असल्याने, सावित्रीबाईं शाळेत मुलींना शिकवायला जाऊ लागल्या की काही अतिकर्मठ लोकं त्याचावर दगड, शेण, चिखल फेकीत. पण सावित्रीबाईंनी या सर्व छळाला शांतपणे तोंड देवून मुलींना शिक्षण देण्याचे कार्य चालू ठेवले. सावित्रीबाईंनी प्रथम शिक्षिका व नंतर मुख्याध्यापिका म्हणून काम केले.महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई यांनी पुढे मुलींसाठी दोन शाळा काढल्या. पुणे येथील हे शिक्षण कार्य पाहून १९५२ मध्ये इंग्रज सरकारने महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा सत्कार जाहीर केला आणि शाळांना सरकारी अनुदानही जाहीर केला. भारतातल्या मुलींना पहिल्या शाळेतील या पहिल्या शिक्षिकेने आपले शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले.
स्त्री शिक्षणासोबतच सावित्रीबाईंनी अनेक रूढी- परंपरा यांच्यामध्येही सुधारणा केल्या. त्याचसोबतच त्यांनी कविता व अभंग लिहिण्यास सुरुवात केली त्यांची अनेक पुस्तके देखील प्रकाशित झाली. त्यामुळे सावित्रीबाई ह्या पहिल्या महिला शिक्षिका,समाज सुधारक व लेखिका म्हणून देखील ओळखल्या जातात. सावित्रीबाईनी ज्योतीबांच्या सर्व कार्यात सहभाग घेतला. स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. पुढे १८९७ मध्ये प्लेगची भयंकर साथ आली असताना त्यांनी आपल्या स्वतः च्या प्रकृतीचीही पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्यांसाठी काम केले . दुर्दैवाने त्या स्वतःच प्लेगच्या भीषण रोगाने बळी ठरल्या. आणि १० मार्च १८९७ मध्ये त्यांचे निधन झाले. सावित्रीबाई यांचे निधन जरी झाले असले. तरी त्या आज प्रत्येक स्त्रीमध्ये तिचा आत्मविश्वास, ज्ञान व सरस्वती बनून जिवंत आहेत.


आज समस्त स्त्रीवर्ग सावित्रीबाईं चा ऋणी आहे. आज त्यांच्या मुळेच समाजातून चूल व मूल या संकल्पनेमध्ये बांधली गेलेली स्त्री हातात पेन व पुस्तक घेऊन स्वतः शिक्षित तर झालीच पण त्याचबरोबर तिने साऱ्या समाजाला ही शिक्षित केले. सावित्रीबाई फुले यांकडून मिळालेले शिक्षण हे समस्त स्त्री वर्गासाठी एक वरदान आहे. असे वरदान ज्याने स्त्री समाजात स्वतःचे अस्तित्व निर्माण करते आहे. स्वतःचे हक्क न्याय विचार याविषयी आज ठामपणे बोलते आहे. प्रत्येक क्षेत्रात स्वतः ची कर्तबगारी दाखवते आहे. पण त्याकाळी स्त्रियांना शिक्षण मिळावे यासाठी सावित्रीबाईंनी सोसलेल्या हालअपेष्टा कष्ट याची कल्पना देखील आपण आज नाही करू शकत. त्यांनी केलेले स्त्री शिक्षणाचे कार्य उच्च कोटीचे आहे. स्त्री शिक्षणाचे जे बीज सावित्रीबाईंनी त्यावेळेस लावले होते, त्याची फळे आजची भारतीय महिला चाखत आहे. शेवटी एवढेच सांगेन की आज प्रत्येक स्त्री हा लेख वाचू शकत आहे याचं कारण फक्त सावित्रीबाई आहेत आणि म्हणूनच आजच्या प्रत्येक स्त्रीला स्वतःला ‘सावित्रीची लेक’ म्हणवून घेण्यात अभिमान वाटतो.

तू क्रांतीज्योती तू धैर्याची मूर्ती।
तू ज्ञानाई तुझ्या ऋणातून
कशी होउ मी उतराई।
मिळाला हक्क शिक्षणाचा
तुझ्या कष्टांमुळे।
आद्य आणि वंद्य तू आमची
लाडकी सावित्रीमाई!

अशा या महानायिकेला रजनी फाऊंडेशन इंडिया तर्फे १८९ जयंतीनिमित्त प्रणाम!

– शुभांगी धनुर्धारी
सदस्य, रजनी फाउंडेशन इंडिया

Leave a Reply